इचलकरंजी : आजच्या समाजातील जात, धर्म, सीमा प्रदेश अशा समस्या या ईश्वरनिर्मित नाहीत, तर आपणच निर्माण केल्या आहेत. त्यामुळे नव्या युगात आपणच सर्वसामान्य माणसांनी या समस्या दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कारण आजचे युग हे सर्वसामान्य माणसांचे आहे. जाती, धर्माची कुंपणे जशी धूसर होत जातील, तशी अधिक चांगल्या व्यवस्थेकडे आपली वाटचाल होईल, अशा प्रकारचे उद्गार लेखक व ‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी काढले.येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन, रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी सेंट्रल आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यातर्फे आयोजित मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत ‘नव्या युगाची आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते.जात, धर्म, देश या माणसाच्या जन्मदत्त निष्ठा असतात. त्या माणसाला जन्माबरोबर आपोआप मिळतात; पण स्वातंत्र्य, समता, बंधुता, नीती, न्याय, लोकशाही, आदी मूल्यनिष्ठा या मिळवाव्या लागतात व त्यासाठी त्यागही करावा लागतो आणि आपण तो करायला हवा. समाजात आज मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतात, ते स्वीकारण्याची मानसिकता आपल्यात निर्माण होण्याची आवश्यकता आहे, असे सांगून त्यांनी भारताच्या आणि जगाच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतला. पूर्वी समाजातील बदल घडण्यास शतकं लागायची, नंतर दशकं लागायची; पण आजच्या काळात दिवसागणिक बदल होताना दिसत आहे, असेही ते यावेळी म्हणाले. १९८० साली जगप्रसिद्ध टाईम मासिकाने केलेल्या पाहणीप्रमाणे २० व्या शतकातील सर्वांत मोठा बदल घडविणारे वर्ष म्हणजे १९६७ साल होय. या वर्षात जगभरात अनेक उलथा-पालथी झाल्या. अमेरिका, संपूर्ण युरोप, अरब, इस्त्रायल, आदी देशांत खूप मोठे बदल झाले. भारतातही ६७ साली प्रथमच सहा-सात राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे स्थापन झाली. तसेच आपल्याकडील अर्थव्यवस्थेच्या बदलाला हळूहळू सुरुवात झाली. या वर्षापासून जगभरात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली. तसेच धर्मप्रभाव कमी होऊ लागला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या समाज जीवनात शिक्षणाचा प्रभाव वाढत गेला, तशी समाजाच्या सर्व क्षेत्रातील मानसिकता बदलत गेली. कुटुंब व्यवस्थेतील एकाधिकारशाही कमी होत गेली, तर धर्मकारण, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रातील एकछत्री सत्ता विखुरली जाऊ लागली, विकेंद्रित झाली. नवीन पिढी बिघडली नाही, तर तुलनेने लवकर वयात येऊ लागली. ही पिढी जात्यंथ नाही. धर्मांध नाही. त्यामुळे या पिढीकडे विधायक दृष्टिकोनातून पाहायला हवे, असेही ते म्हणाले.अध्यक्ष अमर डोंगरे यांनी स्वागत, तर प्रा. समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. संजय होगाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
जाती, धर्माची कुंपणे धूसर होण्याची गरज : द्वादशीवार
By admin | Published: May 15, 2015 9:42 PM