लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांना निवडून आल्यानंतर १२ महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमी पत्र जोडावे लागणार आहे. याबाबतचा अध्यादेश शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे.
राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यापूर्वी उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. आता मात्र निवडणूक आयोगाने यात बदल केला आहे. उमेदवारी अर्जासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अर्ज केल्याचा कोणताही पुरावा तसेच निवडून आल्यानंतर १२ महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करता येणार आहे.
तरी निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र व जात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारावेत, अशी सूचना निवडणूक अधिकारी, निर्णय अधिकारी यांना करण्यात आली आहे.
----
इंदुमती गणेश