पोहाळे तर्फ आळते : डोंगर उतारावरून धावणारे पाण्याचे ओहोळ, आसमंत भेदणारी मोरांची साद, लेण्यातून दिसणारे निसर्गाचे सौंदर्य या सर्वांची अनुभूती घ्यायची असेल तर पोहाळे लेणी पावसाळी पर्यटन एकदा करायलाच हवे. कोल्हापूरपासून १५ कि.मी. अंतरावर वडणगे, निगवे, कुशिरे, पोहाळे व पोहाळेतून गिरोली घाटमार्गे जाणाऱ्या जोतिबा रस्त्यावर एका कडेला ही लेणी आहेत. लेण्यांपासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर जोतिबा मंदिर आहे. या लेण्यांना साधारणपणे दोन हजार वर्षांचा वारसा आहे. मध्यंतरीच्या काळात या लेण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने येथे ओल्या पार्ट्या, फिरस्त्यांचे व प्रेमीयुगुलांच्या बसण्याचे ठिकाण झाले होते. या परिसरात पाऊस जास्त असल्यामुळे या लेण्यांमध्ये पाणी झिरपत असायचे. पाणी एवढे झिरपायचे की, आत छोटे तळेच व्हायचे व पावसाळा संपल्यावरही पाणी ठिबकत राहायचे. यामुळे ही लेणी दुर्लक्षितच राहिली होती. भारतीय पुरातत्त्व खात्याने या लेण्यांची डागडुजी केली आणि या लेण्यांना पुन्हा एकदा झळाळी मिळाली. लेण्यांवर सिमेंट व काही रसायनांची फवारणी केली. त्यामुळे त्यावर एक आवरण तयार होऊन झिरपणारे पाणी बंद झाले.लेण्यातील पडलेले खांब तसेच जीर्ण झालेल्या फरशा बदलून पूर्वीच्या बांधकामाला एकरूप होईल, असे बदल करण्यात आले आहेत. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी फरीद शहा यांनी यासाठी कर्नाटकातील बदामी येथून जांभा दगड मागविला आणि या लेण्यांचा चेहरामोहरा बदलून टाकला. शहा यांच्या मार्गदर्शनाखाली लेण्यांमध्ये जांभ्या दगडातील १४ खांब परत बसवून लेण्यांच्या छताला आधार देण्यात आला. तसेच लोखंडी दरवाजे व खिडक्या बसविल्या आहेत. तसेच तेथे देखरेखीसाठी कायमचा सेवक ठेवलेला असल्याने वर्षा पर्यटनासाठी हे ठिकाण साद घालत आहे. वृक्षारोपण गरजेचेकाही महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीमुळे या परिसरातील वृक्ष जळाले आहेत. या परिसरात वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. तसेच या परिसरात दुर्मीळ पक्षी व प्राण्यांचे वास्तव्य असल्याने निसर्गसंपदाचे जतन होणे आवश्यक आहे.
पोहाळे लेण्यांचे पावसाळ््यातील सौंदर्य मोहविणारे
By admin | Published: July 19, 2016 12:46 AM