कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाऱ्यांना शासन करा, भ्रष्टाचारातून अंबाबाई देवस्थान मुक्त करा, लुटारू व्यवस्थापन हटवा, मंदिर समितीची सीबीआय चौकशी करा..अशी मागणी करीत सोमवारी शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला.हातात भगवे झेंडे आणि देवस्थान विरोधात घोषणा देत गांधी मैदान येथून अर्धा शिवाजी पुतळा, उभा मारुती चौक, ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, भाऊसिंगजी रोड मार्गे मोर्चा बिंदू चौकात आला. यावेळी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट म्हणाले, सरकारचे व्यवस्थापन असलेल्या सर्व मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. यात सहभागी व्यक्तींना शासन झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई म्हणाले, या भ्रष्टाचाराच्या साखळीत लोकप्रतिनिधी, आजी-माजी जिल्हाधिकारी, सचिव, देवस्थानचे कर्मचारी, सदस्य सहभागी आहेत. विधी व न्याय विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. यावेळी बाबासाहेब भोपळे, शिवसेनेचे शहरप्रमुख शिवाजी जाधव, महेश उरसाल यांची भाषणे झाली. या मोर्चात शिवसेना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,सनातन प्रभात, हिंदू जनजागृती समिती, हिंदू एकता आंदोलन, विविध मंदिरांचे पुजारी, तरुण मंडळे, महिला मंडळांमधील सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)पथनाट्य, देखावाया मोर्चाच्या सुरुवातीला देवस्थानमधील ‘भ्रष्टाचाराच्या राक्षसाला’ कडकलक्ष्मी चाबकाचे फटके मारत असल्याचे पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच अंबाबाईनेच भ्रष्टाचाराच्या असुरांचा संहार केल्याचा सजीव देखावाही उभारण्यात आला. लवकरच बैठकबिंदू चौकात मोर्चा विसर्जित झाल्यानंतर कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यात त्यांनी समितीत भ्रष्टाचार करणाऱ्यांना शासन करण्यात यावे, कोट्यवधींचा घोटाळा केलेल्या व्यक्तींची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच बैठक घेवू, असे सांगितले.
‘देवस्थान’ भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा
By admin | Published: February 03, 2015 12:38 AM