कोल्हापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल सोमवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापूरमधील बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आठवड्यानंतर मूळ गुणपत्रिका मिळणार आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या कोल्हापूर पब्लिक स्कूल, सायरस पुनावाला स्कूल, छत्रपती शाहू विद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील अकॅडमीचे शांतिनिकेतन स्कूल, विबग्योर ग्रुप आॅफ स्कूल, संजय घोडावत स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, आदी शाळा आहेत. या शाळांमधील दहावीची परीक्षा मार्चमध्ये झाली. त्याचा निकाल ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर सोमवारी दुपारी जाहीर झाला. त्यात बहुतांश शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.
उत्तीर्णतेमध्ये मुली आघाडीवर आहेत. विद्यार्थी, पालकांनी स्मार्टफोनद्वारे निकाल जाणून घेतला. दरम्यान, कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. विद्यालयातील ७९ विद्यार्थी-विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. त्यामध्ये विनायक सुतार ९७.२० टक्क्यांसह प्रथम, चिन्मय जावल याने ९६.६० टक्क्यांनी द्वितीय, सौरभ पाटील याने ९६ टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळविला. ३१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण, तर २३ विद्यार्थ्यांना मराठी विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. कोल्हापूर पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला.
स्कूलमध्ये अनुष्का मोरे, श्रीदीप एस. डी. यांनी ९६.६ टक्क्यांसह प्रथम, देवाशीष तगारे याने ९६.४ टक्क्यांसह द्वितीय आणि सुहानी गरुड हिने ९६.२ टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळविला. अनुष्का हिने इंग्रजी विषयात ९७, संस्कृतमध्ये १००, समाजशास्त्रमध्ये ९७ गुण मिळविले. श्रीदीप एस. डी. याने गणितमध्ये १०० गुणांची कमाई केली. संस्कृतमध्ये अनय जोशी, देवाशीष तगारे, ज्योर्तिमय इंगवले, ओम सोळंकी, विनित सेन यांनी १०० गुण मिळविले.
समाजशास्त्रमध्ये राजेश्वरी पवार, रिचा मिरजकर, सिद्धी पाटील, सुहानी गरुड यांनी ९७ गुण, तर देवाशीष याने विज्ञानमध्ये ९७, आदिती सावंत हिने हिंदीमध्ये ९५ गुण मिळविले. विशेष उच्च श्रेणीमध्ये ४८ विद्यार्थी, तर प्रथम श्रेणी अन्य विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना आर. एल. तावडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, मुख्याध्यापिका अंजली मेळवंकी, उपमुख्याध्यापिका आशा आनंद यांचे मार्गदर्शन लाभले.