कोल्हापूर : कोल्हापूर शहरात साडेसहा कोटी रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकूण १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यापैकी ११० कॅमेरे बसविले आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची वेळ व तारीख घेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या सुरक्षेसाठी गेल्या दहा वर्षांपासून सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; परंतु त्याला आतापर्यंत मुहूर्त सापडला नव्हता. सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्याचे फायदे काय होणार आहेत, याचे सादरीकरण महापालिकेत करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी बैठक करून सीसीटीव्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाकडून दोन कोटी व महापालिकेतून साडेचार कोटी असा सुमारे साडेसहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. सध्या शहरात ११० ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे हे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सीसीटीव्हीचे मुखमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
By admin | Published: March 02, 2016 12:06 AM