कोल्हापूर : सिद्धार्थनगरातील नर्सरी बागेजवळील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाच्या प्रवेशावरून वाद झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिका प्रशासनाने या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात समाधिस्थळाच्या सुरक्षा भिंतीचे उर्वरित काम सुरू ठेवण्यात आले.महापालिकेतर्फे नर्सरी बागेजवळील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, सुरक्षा भिंतीचे काम सध्या करण्यात येत आहे. या भिंतीच्या कामामुळे सिद्धार्थनगरातून पारंपरिक प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १) या ठिकाणी स्थानिक नागरिक व शाहूप्रेमींमध्ये वाद झाला होता.
काही काळ कामही बंद राहिल्याने महापालिका पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार तो देण्यात आला. त्यानंतर येथील वातावरण तणावपूर्ण बनले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या महापालिका प्रशासन, सिद्धार्थनगर कृती समिती व शाहूप्रेमींच्या बैठकीत महापालिकेच्या आराखड्यानुसार सुरक्षा भिंत उभारण्याचा निर्णय झाला; परंतु सिद्धार्थनगर कृती समितीने तो अमान्य केला.
त्यांनी शनिवारी भिंतीच्या कामाला जोरदार विरोध केला. तरीही विरोध डावलून पोलीस बंदोबस्तात काम सुरू ठेवण्यात आले. कृती समितीने शनिवारी रात्री माजी आमदार मालोजीराजे यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले.असे असले तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव महापालिकेच्या प्रशासनाने रविवारी तीन सीसीटीव्ही कॅमेरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल या इमारतीवर लावले. दिवसभर पोलीस बंदोबस्तात सुरक्षा भिंतीसह पथ वे, लॉनचे काम सुरू राहिले.
दरम्यान, उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, शहर संघटक प्रकाश पाटील, व्ही. के. पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.