कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ६५ ठिकाणी १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हे काम जानेवारी २०१६ अखेर पूर्ण होणार आहे. १ फेब्रुवारीपासून संपूर्ण शहर सीसीटीव्ही यंत्रणेच्या नजरेखाली असणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. राज्यात मुंबई, पुण्यापाठोपाठ धार्मिक स्थळ असलेल्या कोल्हापुरातही दहशतवादी कारवाया होण्याची भीती आहे. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत बनली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी गेल्या दहा वर्षांपासून सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; परंतु त्याला आतापर्यंत मुहूर्त सापडला नव्हता. शहरात सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्याचे फायदे काय होणार आहेत, याचे सादरीकरण महापालिकेत करण्यात आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी बैठक करून सीसीटीव्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाकडून दोन कोटी व महापालिकेतून साडेचार कोटी असा सुमारे साडेसहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. या योजनेबाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, सध्या पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाचे काम पूर्ण होत आले आहे. शहरात स्वतंत्र फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. कॅमरे व इतर साहित्य येऊन पडले आहे. त्याच्या जोडणीचे काम सुरू असून जानेवारीअखेर ते पूर्ण होईल. त्यानंतर फेब्रुवारीपासून सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित होईल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर लक्ष ठेवता येणार आहे. खून, मारामाऱ्यांसह इतर गुन्हेगारीविषयक घटनांवर ‘वॉच’ ठेवता येणे शक्य होणार आहे. या संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र कंट्रोल रूममध्ये दोन शिप्टमध्ये २४ तास कर्मचारी असणार आहेत.या ठिकाणी बसणार सीसीटीव्हीमुंबईच्या एम.आय.पी.एल. कन्सल्टन्सीच्या तज्ज्ञांनी कोल्हापूर शहराचा सर्व्हे केला. त्यामध्ये शिवाजी पूल, टाऊन हॉल, शिवाजी पुतळा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, कावळा नाका, तावडे हॉटेल, कसबा बावडा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी पुतळा, शाहू नाका, बागल चौक, राजारामपुरी, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ, टाकाळा, आदींसह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. त्यानुसार समर्थ सिक्युरिटी कंपनीच्यावतीने कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले.सीसीटीव्हीच्या कामाची माहिती घेतली आहे. नियंत्रण कक्षाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रोजेक्टची संपूर्ण जबाबदारी महापालिका आयुक्तांची आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता लवकरच संपूर्ण शहरात कॅमेरे बसविण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे. - प्रदीप देशपांडे, पोलीस अधीक्षक
फेब्रुवारीपासून शहरावर सीसीटीव्हीची नजर
By admin | Published: January 03, 2016 11:59 PM