कोल्हापूर : फुटबॉल सामन्यांदरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या रसिकांवर सीसीटीव्ही फुटेज पाहून त्वरित गुन्हे दाखल करणार, असा इशारा शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिला. यंदाच्या के. एस. ए. वरिष्ठ गट फुटबॉल हंगामास उद्या, शनिवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी के. एस. ए. कार्यालयात आयोजित केलेल्या सोळा संघांच्या व्यवस्थापक, कर्णधार यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी के. एस. ए.चे अध्यक्ष मालोजीराजे होते.
डॉ. अमृतकर म्हणाले, खेळाचा आनंद मैदानावरच राहिला पाहिजे. त्यांची ईर्षा व चुरस मैदानाबाहेर जाऊ नये. यासह जिंकल्यानंतर एखाद्या संघाचा जल्लोष मैदानातच होईल. त्याची मिरवणूक काढू नये. संघांच्या समर्थकांनी ती काढल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. मैदानाच्या प्रवेशद्वारावरच सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. मैदानातील हालचाली के. एस. ए. कार्यालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील फुटेज तपासून हुल्लडबाजी करणाºयांवर त्वरित गुन्हे दाखल केले जाणार आहेत. मैदानात प्रवेश करताना फुटबॉल रसिकांनी प्लास्टिकची पाण्याची बाटली आणू नये. सोशल मीडियावरून फुटबॉल स्पर्धा, संघ, सामने, आदींबाबत अफवा पसरवणाºयांविरोधातही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे अशा रसिकांनी अफवा पसरवू नयेत, आदी सूचना उपस्थितांना दिल्या.
यावेळी के. एस. ए.चे अध्यक्ष मालोजीराजे यांना वरिष्ठ गटातील सर्व संघांतर्फे यंदा गुणांकनानुसार कमी गुण मिळविणाºया शेवटच्या दोन संघांनाच खालच्या गटात घालावे, अशी लेखी विनंती केली. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एन. नागरगोजे, के. एस. ए.चे पदाधिकारी माणिक मंडलिक, नितीन जाधव, संभाजीराव मांगोरे-पाटील, राजेंद्र दळवी, सर्व संघांचे व्यवस्थापक, कर्णधार, आदी उपस्थित होते.