कोल्हापूर : कोल्हापूर शहरात ६६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी राज्य शासनाकडून साडेसहा कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेली अनेक दिवस या निधीची प्रतीक्षा होती. मध्यंतरी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हल्ल्यानंतरही सीसीटीव्ही नसल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. वाढती गुन्हेगारी रोखण्याबरोबरच शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शासन, पोलीस व महापालिका प्रशासनाच्या सहकार्यातून शहराच्या सुरक्षेसाठी सुमारे साडेसहा कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील सुमारे ६६ महत्त्वाची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून लवकरच संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणण्याचा पोलिस प्रशासनाचा प्रयत्न आहे. शहराच्या सुरक्षेसाठी गेल्या दहा वर्षांपासून सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; परंतु त्याला आतापर्यंत मुहूर्त सापडला नव्हता. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी हा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर व स्थायी समितीचे सभापती आदिल फरास यांच्याशी बैठक करून सीसीटीव्ही प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीचा पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हा नियोजन मंडळाकडून दोन कोटी व महापालिकेतून साडेचार कोटी असा सुमारे साडेसहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. शहरात सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्याचे फायदे काय होणार आहेत, याचे सादरीकरणही महापालिकेत करण्यात आले आहे. हा प्रकल्प लवकर सुरू करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत.
‘सीसीटीव्ही’साठी साडेसहा कोटी
By admin | Published: June 25, 2015 1:27 AM