कोल्हापूर : राजाराम तलाव परिसरातील शिवाजी विद्यापीठाच्या हद्दीमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येतील. त्या परिसरात सुरक्षा विभागाची गस्त वाढविण्यात येईल, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शुक्रवारी दिली.
सरनोबतवाडीच्या मार्गावरील डाव्या बाजूला मोकळी जागा तर उजव्या बाजूला राजाराम तलावाच्या शेजारी कर्मचाऱ्यांची रिकामी निवासस्थाने आहेत. यातील काही परिसर हा विद्यापीठाच्या हद्दीमध्ये येतो. हा परिसर लुटमारीचे ठिकाण बनला आहे. त्यामुळे या परिसराला सुरक्षित करण्यासाठी विद्यापीठाने कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कोल्हापूर दक्षिण विभागाचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे शुक्रवारी केली. त्यावर या परिसरात विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्याचा विचार केला जाईल. पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविण्यात येईल. या परिसरात पाटबंधारे विभागाची काही निवासस्थाने आहेत, त्याठिकाणी सीसीटीव्ही लावण्याबाबत या विभागाला पत्र पाठविण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळातील राजू माने, छाया कांबळे, सुनीता कांबरे, पिटर चौधरी, फिरोज सौदागर, सुखदेव बुद्धीहाळकर, निरंजन कदम, सुरेंद्र माने, बाळासाहेब देसाई, आदी उपस्थित होते.