कोल्हापूर : शहरात वाढणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटना, अपघात व वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात प्रमुख चौकांत १६५ सीसीटीव्ही कॅमेरे, तर दुसऱ्या टप्प्यात पार्किंग झोनच्या ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील १५ दिवसांत कोल्हापूर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली येणार आहे. तत्कालीन गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार सतेज पाटील यांनी सन २०११-१२ गृहराज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोल्हापुरात चौका-चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे जाहीर केले होते पण, गेली तीन वर्षे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. दरम्यान, वाढती गुन्हेगारी, वारंवार होणारे अपघात तसेच चेन स्नॅचिंगच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याची दखल घेऊन शासनाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी देण्याची तरतूद केली. यासाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी, तर महापालिका प्रशासनाने आपल्या निधीतून साडेचार कोटी रुपये असा एकूण साडेसहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रमुख चौकांत, तर दुसऱ्या टप्प्यात पार्किंग झोनमध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. समर्थ सिक्युरिटी या कंपनीला सीसीटीव्ही बसविण्याचा ठेका देण्यात आला. शहरातील महावीर कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, व्हीनस कॉर्नर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी चौक अशा प्रमुख चौकांत १६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. त्यासाठी चौकात स्वतंत्र खांब उभारण्यात आले आहेत. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संपूर्ण कॅमेरे बसविल्यानंतर त्याची चाचणी होणार आहे. त्याची कंट्रोल रूम हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून चौकातील हालचालींवर लक्ष ठेवता येईल.
शहरात ‘सीसीटीव्ही’चे काम सुरू
By admin | Published: February 05, 2016 12:49 AM