पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, माझे धाकटे बंधू भालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितल्याप्रमाणे मला बदनाम करण्यासाठी त्या मुलीला ५० लाख नव्हे, तर पाच कोटी रुपये देण्यात आले होते.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना माझी राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले होते. अश्लील सीडीद्वारे मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचनाचा कट ओरीऑन मॉल नजीकच्या एका अपार्टमेंटमध्ये तसेच यशवंतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये शिजला होता, अशी माहिती रमेश जारकीहोळी यांनी दिली.
जारकीहोळी यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले. ती सीडी बनावट असल्याचे जे मी सांगत होतो त्या मताशी मी आजदेखील ठाम आहेस असे त्यांनी सांगितले. माझ्याविरुद्ध रचण्यात आलेले हे मोठे षडयंत्र असले तरी आपण गप्प बसणार नाही. मला खात्री आहे की सत्य लवकरच बाहेर येईल आणि षडयंत्र रचणारी मंडळी गजाआड होतील.
यावेळी अत्यंत भावनिक झालेल्या रमेश जारकीहोळी यांनी आपल्यासाठी कुटुंबाचा सन्मान सर्वोच्च स्थानी असल्याचे सांगितले. मी षडयंत्र रचणाऱ्यांची नावे सांगू शकत नाही. परंतु ते लोक कोण आहेत हे मला माहीत आहे.
जारकीहोळी यांनी देवेगौडा कुटुंबीयांचे विशेष करून एच. डी. कुमारस्वामी आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू एच. डी. रेवण्णा यांचे आभार मानले. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मी माझी पत्नी आणि माझ्या कुटुंबाचादेखील आभारी आहे, असेही रमेश जारकीहोळी म्हणाले. सीडी प्रसिद्धी माध्यमांसमोर येण्यापूर्वी २६ तास आधी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी मला त्याबाबतची कल्पना दिली होती. मात्र काहीच गैर केलेले नसल्यामुळे मी अजिबात घाबरलो नाही.
"त्या" अश्लील सीडीमागे एक प्रभावी राजकीय नेता असल्याचे संकेत देताना रमेश जारकीहोळी म्हणाले की, मला जेव्हा मंत्रिपद देण्यात आले त्यावेळी या नेत्याने रमेश फार काळ आपले खाते सांभाळू शकणार नाही. अवघ्या तीन महिन्यांत तो मंत्रिपदावरून दूर होईल, असे भविष्य वर्तविले होते. परंतु मी समर्थपणे माझे खाते सांभाळले. या माझ्या यशामुळे निराश झालेल्या त्या नेत्याने माझ्याविरुद्ध हे षडयंत्र रचले असल्याचा आरोप रमेश जारकीहोळी यांनी केला.