भीमगोंडा देसाई कोल्हापूर : फेब्रुवारी महिन्याच्या १४ रोजी देशभर प्रेमिक एकमेकांना मिठी मारून, गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त करतात. त्याच दिवशी यंदा गाय आलिंगन दिन साजरा करण्याचा अजब फतवा केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंडळाचे सचिव डॉ. एस. के. दत्ता यांनी सोमवारी काढला. हा फतवा अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवरील पशुसंवर्धन विभागाकडे बुधवारी आला. पण याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे शासकीय यंत्रणेला अडचणीचे आहे. केंद्र सरकारकडून आदेश आल्याने वरिष्ठ अधिकारी खालच्या अधिकाऱ्यास पत्र पाठवून आपली जबाबदारी झटकत आहेत.पशुसंवर्धनच्या त्या फतव्यात म्हटले आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या पौष्टिक स्वभावामुळे तिला कामधेनू आणि गोमाता म्हणून ओळखले जाते. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचा आलिंगन दिवस म्हणून साजरा करावा.सोशल मीडियातून खिल्लीगाय आलिंगन दिन साजरा करण्यासंबंधी पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. गाईला बैल, वासरूही आलिंगन देत नाही तर इतर लोक कशी मिठी मारणार, असा प्रश्न सोशल मीडियावर अनेक जण विचारून या आदेशाची खिल्ली उडवत आहेत. पालन, पोषण करणाराही गाईला मिठ्ठी मारत नाही तर प्रेम व्यक्त करण्यासाठी अंगावरून हात फिरवतो, चांगला आहार देतो. त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी आलिंगन द्या, असा आदेश देणे म्हणजे शुध्द भंपकपणा असल्याच्याही सार्वत्रिक प्रतिक्रिया आहेत.
गाईला मिठी मारून उद्घाटन होणार का ?परक्या व्यक्तीने गाईचे आलिंगन घेताना ती उधळून जखमी केली, किंवा त्या गाईच्या अंगावरील गोचिड, पिसवा चिकटल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा खोचक प्रश्नही विचारला जात आहे. गाय आलिंगन दिनाचे उद्घाटन आमदार, खासदार, अधिकारी गाईला आलिंगन देत फोटोसेशन करून करणार की, केवळ वातानुकूलित कार्यालयात बसून आदेश देणार याबद्दल जनमानसात उत्सुकता आहे.
गाय आलिंगन दिन साजरा करण्यासंबंधीचे पत्र मिळाले आहे. याच्या अंमलबजावणीची कार्यवाही सुरू आहे. - वाय. ए. पठाण उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, कोल्हापूर