कुरुंदवाड : कोरोना पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीवर पूर्णता बंदी असून शासनाने गणेशोत्सवाबाबत घालून दिलेल्या नियमांचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांनी केले. गणेशोत्सवानिमित्त येथील पागे मंगल कार्यालयात आयोजित गणेश मंडळाच्या शांतता बैठकीत उपअधिक्षक महामुनी बोलत होते.
ते म्हणाले, शहराला धार्मिक सलोख्याची परंपरा आहे. येथील मशिदिमध्ये हिंदू, मुस्लिम बांधवांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून संपूर्ण देशाला जातीय सलोख्याचा आदर्श घालून दिला आहे. कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत शासनाने नियमावली तयार केली आहे. या नियमांचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. शिवाय गणेशाचे आगमन अथवा विसर्जन शांततेत आणि मिरवणूक न काढता करावा. शांततेत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाला पोलीस प्रशासनाचे सहकार्य राहील. मात्र नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही महामुनी यांनी दिला.
या वेळी गणेश मंडळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या वेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.