लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : कोरोना संसर्गामुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबरोबरच "एक गाव-एक गणपती" उपक्रम, पर्यावरण रक्षणासाठी मूर्ती पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा गणेश मंडळांनी मूर्ती दान उपक्रम राबवावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी गारगोटी येथे केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील पोलीस पाटील व सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांची बैठक अशोका हॉलमध्ये झाली,त्यावेळी गायकवाड बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक संजय मोरे हे प्रमुख उपस्थित होते.
जयश्री गायकवाड म्हणाल्या, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून तो खर्च समाजोपयोगी कारणासाठी खर्च करावा. एखाद्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याबरोबरच आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे घेऊन गणेश मंडळांनी विधायक कार्य करावे.
प्रारंभी भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,सरपंच संदेश भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस पोलीस उपअधीक्षक संदेश देवळेकर, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, विस्तार अधिकारी सुशांत येरुडकर, सतीश पाटील, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, युवराज धोंगडे, दत्तात्रय घाटगे, सुभाष पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व गावांचे पोलीस पाटील, गणेश मंडळाचे पदाधिकारी, डॉल्बी मालक उपस्थित होते. आभार पोलीस निरीक्षक अमित देशमुख यांनी मानले.
फोटो- गारगोटी येथे गणेश मंडळाच्या पदाधिकारी बैठकीत अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गणेश इंगळे, संजय मोरे, सरपंच संदेश भोपळे आदी उपस्थित होते.
२७ गारगोटी पोलीस बैठक