कोल्हापूर : मुस्लिमबांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साध्या पद्धतीने आणि मार्गदर्शक नियमांनुसार साजरी करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अनाधिकृत श्वान प्रजनन संस्था (डॉग बिडिंग सेंटर) आणि पेट शॉपवर स्थानिक स्वराज्य संस्थांनी कारवाई करावी, असे आदेश दिले.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी जिल्ह्यात पशु अत्याचार निवारणाबाबत आतापर्यंत २७ केसेस दाखल झाल्या असून त्या निकाली काढल्याचे सांगितले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद पवार यांनी प्राण्यांचे आजार, उपचार, लसीकरण व शासकीय योजनांची १९६२ या टोल फ्री नंबरवर उपलब्ध असल्याचे सांगितले. यावेळी सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, शिक्षण अधिकारी प्राथमिक आशा उबाळे, मनपा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, यांच्यासह शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
---