राधानगरी : राधानगरी तालुक्यातील दुर्गम असलेल्या वाकीघोल परिसरातील लोकांनी रक्षादेवी घाटमार्गाची श्रमदानातून साफसफाई करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. पाच किलोमीटर अंतरावरील झुडपे तोडून वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यात आला. बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत होते.
या परिसराचा पावसाळ्यात राधानगरीशी संपर्क तुटतो. त्यामुळे या नागरिकांना कडगाव व गारगोटीचा आधार घ्यावा लागतो. मात्र, हा रस्ताही रक्षादेवी घाट मार्ग व जंगलातून जातो. त्यामुळे दुतर्फा झाडेझुडपे यांचा अडथळा असतो. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मैलकुली नसल्याने त्यांच्याकडून देखभाल होत नाही. त्यामुळे वाहतुकीस अडथळा करणारी झाडेझुडपे तोडून साफसफाई करण्यात आली. पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या चरी मुजविण्यात आल्या. राजू ढोकरे, भरत पाटील,बाळू धोंड, सरपंच नारायण राणे, सागर पाटील, माजी उपसरपंच सखाराम बेतम, प्रकाश राणे, विक्रम,सागर, रंगराव केसरकर, शिवाजी केसरकर, नारायण पाटील यांच्यासह सर्व गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.