कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बैलांप्रति कृतज्ञता भाव व्यक्त करणारा कर्नाटकी बेंदूर सण शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त पंचगंगा नदी घाटावर बैलांसह आलेल्या नागरिकांची गर्दी होती.वटपौर्णिमेनंतर दुसऱ्याच दिवशी कर्नाटकी बेंदूर हा सण येतो, शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. महाराष्ट्रात कर्नाटकी आणि महाराष्ट्रीयन बेंदूर असे दोन बेंदूर साजरे होतात. कोल्हापुरातील शहरी भागात कर्नाटकी बेंदूर तर ग्रामीण भागात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा होतो. यानिमित्त शुक्रवारी घराघरात मातीच्या बैलजोडीचे पूजन करून त्यांना गोड चकल्या, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
शेतकऱ्यांनी सकाळीच बैलांना न्हाऊ माखू घालून त्यांना छान झूल चढवली, शिंगांना रंगरंगोटी, गोंडे, गळ्यात घुंगूर असा थाटमाट करून औक्षण करण्यात आले. यानिमित्त पंचगंगा नदी घाटावर शेतकऱ्यांसह बघ्यांचीही मोठी गर्दी होते. येथे वाद्यांच्या तालावर बैलांना नाचवले जात होते. अनेकजणांनी आपल्या लाडक्या बैलांसोबत सेल्फी काढली. तर अनेकांनी याचे चित्रीकरण केले.