कागल : नगरपालिकेच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात भव्य प्रमाणात साजरी होते. मात्र, कोरोनाचा धोका आजही कायम असल्याने यावर्षी मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात येणार असून, सर्वांनी शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्षा माणिक माळी यांनी केले आहे.
नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, भया माने, प्रकाश गाडेकर, रमेश माळी सर्व नगरसेवक उपस्थितीत होते.
नगराध्यक्षा माणिक माळी म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी शासन आदेशानुसार यावर्षी भव्य मिरवणूक, तसेच इतर कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र, शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिषेक आणि शिवजन्मकाळ सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होईल. सर्वांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.