कोल्हापूर : वन्यजीव संवर्धनासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने वन व वन्यजीव विभाग कोल्हापूर आणि शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागातर्फे १ ते ७ आॅक्टोबरदरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. याअंतर्गत विविध स्पर्धा, स्वच्छता अभियान, वन्यजीवविषय व्याख्यानमाला, चित्रकला, रांगोळी असे कार्यक्रम घेण्यात आले.तंत्रज्ञान अधिविभागात या सप्ताहाचे उद्घाटन उपवनसंरक्षक हणमंत धुमाळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांचे जैवविविधता विषयावर व्याख्यान झाले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक जयदीप बागी यांनी तंत्रज्ञानाबरोबर वन, वन्यजीव आणि परिसंस्थेचे आधुनिक जगात असलेले महत्त्व सांगितले.
दरम्यान, महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. फोटोग्राफी, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. विद्यामंदिर पडसाळी (ता. राधानगरी) येथे चित्रकला स्पर्धा झाली. अमोल कुलकर्णी यांचे वन्यजीव संरक्षण विषयावर व्याख्यान झाले. तबक उद्यान (पन्हाळा) येथे स्वच्छता मोहीम घेण्यात आली. निसर्ग माहिती केंद्र येथे भेट देण्यात आली.
तंत्रज्ञान अधिविभागात ‘प्लास्टिक वापराविषयी जनजागरूकता व प्लास्टिकचे तोटे’ या विषयावर जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी टेक्विप समन्वयक श्रीकांत भोसले, आदी उपस्थित होते. या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी, अधिविभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.