आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0९ : पती-पत्नीच्या नात्यांची वीण अधिक घट्ट करणारी वटपौर्णिमा गुरुवारी पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. वडाच्या झाडाचे पूजन, सणाच्या नावाखाली फांद्यांची होणारी तोड रोखत प्रत्यक्ष वडाचे रोप लावून काठापदराच्या साड्या, गजरा, सौभाग्यालंकारांचा साज लेवून महिलांनी निसर्गापुढे पतीच्या दिर्घायुष्याची व साताजन्माच्या सहवासाची कामना केली.
पावसाच्या आगमनाची चाहूल देणारी वटपौर्णिमा म्हणजे निसर्गाप्रतीची आदराची भावना. सावित्रीने यमाच्या तावडीतून पतीचे प्राण आणले ही पौराणिक कथा या दिवसाला जोडलेली असली तरी त्यातून वडाच्या झाडाचे असलेले औषधी महत्व आणि निसर्गाचे रक्षण अधोरेखित केले आहे. पौर्णिमा दोन दिवस असली तरी गुरुवारीच वटपौर्णिमा साजरी करावी असे आवाहन पंचांगकर्त्यांकडून करण्यात आले होते.
गुरुवारी सकाळपासूनच शहरातील पेठा, गल्ली , कॉलन्यातून काठापदराच्या हिरव्य साड्या परिधान करुन आणि सौभाग्यालंकारांचा साज लेवून महिला घराबाहेर पडल्या. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर हातात पूजेचे ताट घेवून सजून धजून निघालेल्या महिला दिसत होत्या. यानिमित्त अंबाबाई मंदिर परिसरातील रामाचा पार येथे महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. अनेक महिलांनी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पूजा करण्याला प्राधान्य दिले . तर पौर्णिमा दुपारी चारनंतर सुरु होणार असल्याने काही महिलांनी सायंकाळी पूजा केली. नवविवाहिता या पहिल्याच सणाबद्दल अधिक उत्सूक होत्या.
निसर्ग मित्रकडून ३०० रोपांचे वाटप
वटपौर्णिमेच्या नावाखाली वडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. मात्र पर्यावरणप्रेमींनी केलेल्या प्रबोधनामुळे अनेक महिलांनी तोडलेल्या फांद्याची नव्हे तर वडाच्या रोपांची पूजा केली. त्यासाठी निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने तीनशे रोपे तयार करण्यात आली होती. सणाच्या पूर्वसंध्येलाच अनेक महिलांनी अडीचशेहून अधिक रोपे नेली होती. पुजेनंतर ती परिसरात लावण्यात आली. पतीची साथ सात जन्म मिळेल की नाही माहित नाही पण पुढच्या सात पिढ्या हे वृक्ष सावली देतील असे संदेश पाठवण्यात आले. खास पुजेसाठी सजीव नर्सरीनेदेखील वडाच्या रोपांचा सोय केली होती. पूजेनंतर रोप तुमच्या परिसरात लावा आणि शक्य नसेल तर परत करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पत्नी नव्हे मैत्रिण..
पतीसाठी पत्नीने उपवास करायचे. व्रत वैकल्ये करायची या पुरुषप्रधान मानसिकतेवर या सणाच्या निमित्ताने व्हॉटसअपवर या अंधश्रद्धेतून महिलांनी बाहेर यावे अशा कविता फिरत होत्या. कुठे चाललीय वड पुजाया. पती पत्नी शिवाय आहे आपली मैत्री, जीवनसाथी मी, मालक समजू नको अशा कविता व स्त्रींमुक्तीच्या कविता शेअर केल्या जात होत्या.