सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील आळवे गावात चिखलमातीच्या गणेशमूर्ती बनवून गेल्या शंभर वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव आजही साजरा करीत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडूऐवजी चिखलमातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना घरगुतीसह सार्वजनिक मंडळे करतात. गौरीगणपती विसर्जनावेळीचे निर्माल्य खड्ड्यात बुजवून त्याची विल्हेवाट लावली जाते; त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक गौरीगणपती विसर्जन करण्याचा इतिहास आळवे गावाला आहे.गावात भैरवनाथ देवालय असल्याने देवाला रंग आवडत नसल्याने, भक्तीतून आळवेत चिखलमातीचा गणेशोत्सव साजरा करतात. काही वर्षांपूर्वी मित्र, नातेवाईक ‘चिखलाचा गणेशोत्सव साजरे करणारे गाव’ म्हणून हिणवायचे. अलीकडे इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधन सुरू असल्याने यापूर्वी गावाला हिणवणारे लोक आता कौतुक करत असल्याने गावकऱ्यांना त्याचा अभिमान आहे. ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये; त्यामुळे परंपरेचा ठाव घेण्यापेक्षा पूर्वापर चालत आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या परंपरेचा वसा गावकऱ्यांनी आज चालू ठेवला आहे.अठराशे लोकसंख्या असलेल्या गावात घरगुतीसह १३ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती तीन-चार फुटांपर्यंत चिखलमातीपासून बनविलेल्या असतात. गणेशचतुर्थीच्या आधी चारच दिवस गणेशमूर्ती बनविल्या जातात. वर्गणीसाठी हट्ट नाही, डॉल्बीचा दणदणाट नाही की मूर्तींची ईर्ष्या नाही. पारंपरिक पद्धतीच्या सवाद्य गणेशमूर्तीचे आगमन आणि विसर्जन केले जाते. गणेशोत्सवातील एकीच्या बळामुळे गावातील मंडळात ईर्ष्या नसल्याने राजकीय वैरत्व कमी; शिवाय गुन्हेगारी प्रकार कमी असल्याने गावातील लोक गुण्यागोविंदाने राहतात. पर्यावरणपूरक गणशोत्सव आळवे गावापुरता मर्यादित न राहता तालुक्यातील गावागावांत साजरा होण्याची आळवेकरांची अपेक्षा आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना आळवे गावापुरती मर्यादित न राहता ती सामाजिक चळवळ बनली पाहिजे. प्रथमत: तिची सुरुवात घरातून झाली तर तिचे अनुकरण मंडळे करतील. सणाचे मूळ स्वरूप समाजावून घेऊन त्याचा निसर्गावर वाईट परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली तरच उत्सव आणि सण आनंदाने साजरे होतील. - संजय गावडे शिक्षक, आळवे, ता. पन्हाळा