कोल्हापूर, दि.7 - येथील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अॅण्ड रिसर्च ट्रस्टमधील (सायबर) विद्यार्थ्यांनी तृतीयपंथियांसमवेत सोमवारी राखी पौर्णिमा साजरी केली. या अनोख्या उपक्रमातून त्यांच्यात एकप्रकारे सामाजिक भावनांचे बंध बांधले गेले.
सायबरमधील समाजकार्य विभागातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात ‘मैत्री’ संघटनेच्या मयूरी आळवेकर, स्मिता, शिल्पा आणि अंकिता यांनी विद्यार्थ्यांना राखी बांधल्या. यावेळी स्मिता यांनी तृतीयपंथी असल्यामुळे घरातील सख्या भावंडांनी नाकारले आहे; परंतु,आज या विद्यार्थ्यांनी राखी बांधून घेऊन एक नवीन नाते निर्माण केले असल्याचे सांगितले. शिल्पा यांनी आम्हालादेखील समाजाने स्वीकारून माणूस म्हणून वागणूक द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. अंकिता यांनी हा उपक्रम स्वागतार्ह असून याची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात दिव्यांक ओकोओ या परदेशी विद्यार्थ्यालाही राखी बांधण्यात आली. यावेळी ‘सायबर’ चे संचालक डॉ. एम. एम. अली, प्रशासकीय अधिकारी विनायक साळोखे, डॉ. के. प्रदीपकुमार, एस. एस. आपटे, सोनिया रजपूत, मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख डॉ. ए. डी. जाधव, प्रा. डॉ. दीपक भोसले, आदी उपस्थित होते. चेतन भंडारे, ललित पेडणेकर, अवी साखरे, देवदत्त माळवी, अमर लोखंडे, स्नेहल पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ऐश्वर्या जोशी यांनी प्रास्ताविक केले. किरण चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. शिवराज जाधव यांनी आभार मानले.
नैतिक बळ मिळाले....
आजच्या गतिमान व तंत्रज्ञानाच्या युगातदेखील लिंग-भेदावरून समाजात तृतीयपंथियांना उपेक्षित वागणूक दिली जात आहे. अशा स्थितीत ‘सायबर’मधील या उपक्रमाने आम्हास नैतिक बळ मिळाले असल्याचे मयूरी आळवेकर यांनी सांगितले.