कोल्हापूर : जिल्ह्यात उत्सुकता लागून राहिलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’च्या विजेत्यांची घोषणा आज, बुधवारी करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता येथील राजारामपुरीतील ताराराणी विद्यापीठाच्या डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात शानदार समारंभामध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.गावा-गावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड २०१७’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. ग्रामविकासामध्ये विशेष कामगिरी करून दाखविणाºया सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.काँग्रेसचे नेते व माजी ग्रामविकास राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील-कळेकर, निवड समितीमधील प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारतआप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.पहिल्याच वर्षी पुरस्कारासाठी केलेल्या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे २५० हून अधिक सरपंचांनी आपले प्रस्ताव सादर केले. जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी अशा ११ कॅटॅगरीमध्ये हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाºया सरपंचांसाठी ‘सरपंच आॅफ द ईयर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कार देण्यात येणार आहेत. ग्रामविकास क्षेत्रात अनेक वर्षे उल्लेखनीय कार्य करणाºया मान्यवरांची निवड समिती यासाठी तयार करण्यात आली होती. त्यांनीच या सर्व प्रस्तावांचे मूल्यमापन करून निकाल तयार केला आहे. त्यानुसार विजेत्यांची घोषणा या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व सरपंच बंधू-भगिनींनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’ समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.
‘लोकमत सरपंच अवॉर्डचा आज कोल्हापुरात सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:12 AM