कोल्हापूर : देशात आता जनगणनेचे काम सुरू होत असून यामध्ये प्रत्येक जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी मल्हार सेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व खुला या वर्गवारीमध्येच जनगणना केली जाते. मात्र देशातील ५२ टक्के लोक हे मागासवर्गीय आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षात या वर्गाचा विकास झालाच नाही. विकासापासून हा समाज वंचित राहिला असून यासाठी आगामी जनगणना ही जातनिहाय झाली पाहिजे, अशी मागणी मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी केली.
या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले. यावेळी मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख बयाजी शेळके, महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे, छगन नांगरे, दत्ता बोडके, बाबूराव बोडके, बाळासाहेब दाईंगडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
जातनिहाय जनगणना करा, या मागणीचे निवेदन मल्हार सेनेच्यावतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिले. यावेळी बबन रानगे, बयाजी शेळके, राजू हजारे आदी उपस्थित होते.
(फोटो-१७०२२०२१-कोल- मल्हारसेना)