चंदगड : पारगड-मोर्ले या रस्त्याला केंद्र शासनाची मंजुरी मिळाली असून यासाठी भराव्या लागणाऱ्या दोन कोटी रुपयांची जबाबदारी राज्य शासन उचलणार असल्याचे वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.किल्ले पारगड (ता. चंदगड) येथील पारगड संवर्धन व विकास या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच विद्याधर बाणे होते.केसरकर म्हणाले, विकासकामांच्या केवळ घोषणा करून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष कामांची अंमलबजावणी केली पाहिजे. पारगड हा स्वराज्यातील अजिंक्य किल्ला आहे. गडावरील गडकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारगडचा समावेश ‘इको टुरिझम’मध्ये केल्याचे सांगून गडावर असणाऱ्या ७० पैकी ५५ ग्रामस्थांची त्यांच्या नावावर घरे होणार आहेत. उर्वरित १४ जणांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा. त्यातील त्रुटीही दूर करू, असे सांगितले. आज जरी हा किल्ला वनविभागाच्या ताब्यात असला तरी १६७६ पासून येथे गडकरी वास्तव्यास आहेत. त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी न्याहारी निवास योजना, तलावाचे संवर्धन, डागडुजी, आदी कामांसाठी निधी मंजूर करून येथील ग्रामस्थांना उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पर्यटनाच्या माध्यमातून पारगडचा विकास करणे शक्य आहे. विकास व संवर्धन योजनेतून स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याबरोबरच संकेतस्थळाच्या माध्यमातून पारगडचा इतिहास जगासमोर आणू, असे सांगितले. मोर्लेच्या सरपंच सुजाता मणेरीकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पारगड ग्रामस्थ व चंदगड तालुका शिवसेनेच्या वतीने केसरकर यांचा छ. शिवाजी महाराजांची मूर्ती व भवानीमातेचा फोटो देऊन सत्कार झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेश पाटील, प्रा. सुजित शिंत्रे, उपवनसंरक्षक रंगनाथ नाइकडे, रघुवीर शेलार, वसंत सोनार, विलास जाधव, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, सुषमा चव्हाण, शांता जाधव, जी. टी. पवार, आदींसह अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कान्होबा माळवे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार गोरुले यांनी सूत्रसंचालन केले. वसंत नागरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)तेरवणसाठी जादा निधी देऊचंदगड तालुक्याच्या हद्दीत तेरवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. जिल्हा व तालुका मुख्यालयापासून हे गाव लांब असल्याने या गावचा विकास म्हणावा तितका झाला नाही. त्यामुळे विकासासाठी यापुढे सर्वाधिक निधी तेरवण गावासाठी देऊ, असे आश्वासन केसरकर यांनी यावेळी दिले.किल्ले पारगड वेबसाईट संकेतस्थळाचे उद्घाटनयावेळी शिवेसना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी तयार केलेल्या किल्ले पारगड या वेबसाईट संकेतस्थळाचे उद्घाटन दीपक केसरकर यांनी संगणकाचे बटन दाबून केले.
पारगड-मोर्ले रस्त्याला केंद्राची मंजुरी
By admin | Published: February 06, 2015 12:18 AM