जयसिंगपूर : केंद्र सरकारने मंजूर केलेल कृषी विधेयक तत्काळ रद्द करावे. कोरोना काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, यासह मागण्यांप्रश्नी शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीच्यावतीने क्रांती चौकात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.
केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची संकल्पना आखली आहे. याला विरोध म्हणून लाखो शेतकरी दिल्लीच्या संसद भवनावर आंदोलन करीत आहेत. यावेळी केंद्र सरकारकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, पाण्याचे फवारणे व दडपणूक करून आंदोलकांना त्रास देण्याचा जो घाट आहे, त्याचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन जयसिंगपूर पोलीस ठाण्यास देण्यात आला.
कोरोना काळामध्ये उद्योग, कामधंदे बंद असल्यामुळे महावितरणकडून वाढीव आलेली वीज बिले भरणे मुश्किलीचे बनले आहे. त्यामुळे ही बिले माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी दिगंबर सकट, रूपाली धुमाळ, अफरीन तहसीलदार, नुसरत मुजावर यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.
फोटो - ०४१२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे शिरोळ तालुका पूरग्रस्त निवारण समितीच्यावतीने क्रांती चौकात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.