इचलकरंजी : हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विधानपरिषदेचे मतदार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची घेतलेली भेट आणि आमदार सुरेश हाळवणकर यांच्या शहर विकास आघाडीने दिलेल्या पाठिंब्यामुळे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना इचलकरंजीतून मिळणारे गठ्ठा मतदान आदी घडामोडींमुळे विधानपरिषद निवडणुकीचा केंद्रबिंदू जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे सरकला आहे.विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री आवाडे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील आणि माजी राज्यमंत्री सतेज पाटील या चौघांनीही उमेदवारी मागितली आणि राजकीय हालचाली गतिमान झाल्या. विधानसभेत कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने सत्ता गमावल्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीकडे दोन्हीही पक्षांच्या श्रेष्ठींचे लक्ष आहे. चौघांनीही ‘इलेक्शन मेरीट’ आपल्याकडे असल्याचा दावा केल्याने आणि मुंबई-दिल्लीच्या वाऱ्यांमुळे निवडणुकीतील स्पर्धा वाढली आहे. विधानपरिषदेसाठी इचलकरंजी नगरपरिषदेकडे ६२ नगरसेवकांसह हातकणंगले तालुक्यात ९३ व शिरोळ तालुक्यात ५६ असे एकूण १४६ मतदार आहेत. निवडणुकीतील आवाडे यांना इचलकरंजीतील आमदार हाळवणकर यांच्या शहर विकास आघाडीने ‘गावाच्या विकासासाठी’ पाठिंबा दिल्याने आवाडेंच्याकडे एकदमच ६२ मतांचा गठ्ठा तयार झाला. तसेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यात आवाडेंचा सातत्याचा संपर्क यामुळे दोन्ही तालुक्यात त्यांना मानणारा वर्गही आहे. दरम्यान, आवाडेंना उमेदवारी न मिळाल्यास इकडून माजी आमदार अशोक जांभळे आणि माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांनी उमेदवारी भरण्याची तयारी सुरू केली आहे.अशा पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. कारण कॉँग्रेसचे विधानपरिषदेतील उमेदवार निवडून येण्यापेक्षा दोन्ही कॉँग्रेसची ‘फूट’ ‘भाजप’च्या पथ्यावर पडेल, अशी नीती यामागे असावी, अशी चर्चा आहे. मात्र, आवाडे यांना उमेदवारी मिळाल्यास यड्रावकर त्यांच्याच बरोबर राहतील, असे संकेत यड्रावकर यांनीच स्वत: आवाडे यांना दिले आहे. या पाठोपाठच आता आवाडेंनी शुक्रवारी विनय कोरे व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचीही भेट घेऊन पाठिंब्यासाठी मागणी केली. उमेदवारीसाठी ‘लॉबिंग’ची चर्चाउमेदवारी तिघांपैकी एकास मिळाल्यास उर्वरित दोघे उमेदवारी मिळणाऱ्यास पाठिंबा देतील, असे लॉबिंग पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे व महादेवराव महाडिक यांनी मुंबई व दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींसमोर केले आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेज पाटील यांचे महाडिक यांच्याशी राजकीय वैमनस्य असले तरी त्यांनी ‘महाडिक वगळून आम्हा तिघांपैकी एकास उमेदवारी दिल्यास उर्वरित दोघांची जबाबदारी पक्षाच्या उमेदवारास निवडून आणण्याची राहील’, असे आतापर्यंत एकदाही सांगितलेले नाही, याचीच चर्चा या दोन तालुक्यांतील राजकीय क्षेत्रात आहे.
विधानपरिषदेचा केंद्रबिंदू जिल्ह्याच्या पूर्व भागात
By admin | Published: December 04, 2015 11:43 PM