आजच्या यांत्रिकी, धकाधकीच्या व स्पर्धात्मक युगामध्ये नागरिकांची जीवनशैली शारीरिकदृष्ट्या निष्क्रिय होत असून शारीरिक हालचाली, व्यायामाचा अभाव व वाढत्या प्रदूषणांमुळे अनेक दुर्धर विकार नागरिकांना त्रस्त करीत आहेत. याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. शारीरिक सुदृढता व याद्वारे आरोग्यसंपन्न, कार्यक्षम जीवनाचे महत्त्व बालमनावरबिंबविण्यासाठी निरोगी आरोग्य आणि संपन्न जीवन नागरिकांना जगता आले पाहिजे. यासाठी ‘खेळाद्वारे सुदृढता’ हाच केंद्रबिंदू मानून प्रत्येक ठिकाणी काम करण्याची माझी पद्धत आहे, असे नूतन जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांनी सांगितले. प्रश्न : कोल्हापूरची क्रीडा परंपरा उज्ज्वल करण्यासाठी कोणते प्रयत्न करणार?उत्तर : कोल्हापुरात सध्या फुटबॉल, क्रिकेट, कुस्तीकडे मुलांचा सर्वांत जास्त ओढा असल्याचे दिसत असले तरी, या ठिकाणी जलतरण, शूटिंग या खेळांसह अन्य खेळही रुजत आहेत. अनेक खेळाडूंनी यामध्ये कोल्हापूरचा नावलौकिक वाढविला आहे. या खेळांबरोबरच अन्य खेळांचा प्रचार व प्रसार करण्याच्यादृष्टीने माझा विशेष प्रयत्न राहील. खासकरून ग्रामीण भागामध्ये हे खेळ कसे रुजविता येतील, हे पाहणार आहे. तेथील टॅलेंट पुढे आणणे गरजेचे आहे. शासनाच्या खूप योजना आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी राबविण्यासाठी मी विशेष लक्ष देत आहे. ज्येष्ठ खेळाडू, प्रशिक्षक आहेत. त्यांच्याद्वारे नवीन खेळाडूंना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. यासाठी सर्व संघटना, क्रीडाशिक्षक, तालीम संस्था यांना एकत्र बोलावून, त्यांची एक मोट बांधून कोल्हापुरातील या क्रीडा परंपरेची जोपासना व संवर्धन करण्याचा माझा मानस आहे. प्रश्न : क्रीडाक्षेत्रासमोरील आव्हाने कोणती आहेत?उत्तर : क्रीडाक्षेत्रासमोरील सर्वांत मोठी समस्या म्हणजे चांगले खेळाडूच तयार होत नाहीत. याला प्रमुख कारण म्हणजे आताची मुले मैदानावर येत नाहीत. धावपळीच्या युगामुळे याबाबत पालकही जागृत नाहीत, असे पाहण्यास मिळते. इंटरनेट, मोबाईल, संगणक यांसारखी करमणुकीची साधने वाढल्याने याच गोष्टी मुलांचे विश्व बनले आहे. यातून मुलांनी बाहेर पडले पाहिजे. पालकांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला पाहिजे. ‘अरे, उडी मारू नको; पडशील,’ अशी बारीकसारीक बंधने मुलांवर लादली जातात. त्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच खेळाबद्दल भीती निर्माण होते. मुलांना मैदानात खेळण्यासाठी सोडले पाहिजे, त्यांना मुक्तपणे खेळू द्या. मुले खेळलीच नाहीत, तर नवीन खेळाडू कुठे तयार होणार? विशेषकरून पालकांनी मुलांवर आपली खेळाची आवड लादू नये. त्यांना कोणता खेळ आवडतो तो खेळू द्यावा. प्रश्न : खेळांमध्ये चांगल्या प्रकारे करिअर करता येते का?उत्तर : करिअर म्हणजे नेमके काय? तर आपल्या आवडीचे काम करणे, चांगल्या पगाराची व सुरक्षित नोकरी हेच ना? तर माझ्या मते क्रीडाक्षेत्रात सर्वांत उत्तम करिअर करण्याची संधी आहे. शासनाच्यावतीने खेळाडूंसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. राज्य, आंतरराष्ट्रीय स्तरांवर विशेष कामगिरी केल्यानंतर विशेष निधीसह, सरकारी नोकऱ्यांमध्ये विशेष सवलत दिली जाते. शालेय स्तरावर अभ्यासक्रमात विशेष ग्रेस गुणही दिले जातात. हे असे क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी राहून तुम्ही तुमचा आवडीचा खेळ जोपासू शकता व त्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवू शकता. करिअर व आपला खेळ हे दोन्हीही तुम्ही याठिकाणी जोपासू शकता. मात्र, यासाठी प्रत्येक खेळाडूने आपले गाव, शहर सोडण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. प्रश्न : खेळाच्या विकासासाठी कोणते विशेष प्रयत्न केले पाहिजेत ?उत्तर : खेळाचा विकास करण्यासाठी प्रथम शाळेतील क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक, क्रीडा संघटना यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. आता नवीन खेळ तर येत आहेत; पण त्यासोबत जुन्या खेळांचे नियम बदलत आहेत. यांचे अद्ययावत प्रशिक्षण क्रीडाशिक्षक व प्रशिक्षकांना दिले पाहिजे. यासाठी ठराविक कालावधीनंतर प्रशिक्षकांची विशेष कार्यशाळा घेतली पाहिजे. अशा कार्यशाळेतून त्यांना अद्ययावत माहिती मिळेल. याद्वारे खेळांचा नक्कीच विकास होईल. फक्त खेळाडूंवरच लक्ष केंद्रित न करता आबालवृद्ध नागरिकांमध्ये शारीरिक सुदृढता आणि याद्वारे आरोग्यसंपन्न, कार्यक्षम जीवनाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रश्न : विभागीय क्रीडासंकुलाचे काम केव्हा पूर्ण होईल?उत्तर : कोल्हापुरातील विभागीय क्रीडासंकुलाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. काही महिन्यांपूर्वीच मी या पदावर रुजू झालेलो आहे. विभागीय क्रीडासंकुल हे शहराच्या मध्यभागी असून, ते सर्वांच्या सोयीसाठी असल्याने, यंदा महापालिका क्रीडास्पर्धा असो किंवा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा; यांतील जास्तीत जास्त स्पर्धा याठिकाणी कशा प्रकारे खेळविता येतील यांचे नियोजन करण्याचा माझा मानस आहे. या ठिकाणी मैदानांचे नियोजन चांगले आहे. मात्र, काही मैदानांची फिनिशिंगची कामे अजून पूर्ण व्हायची आहेत. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करून ही मैदाने खेळण्यासाठी खुली करणार आहे. - प्रदीप शिंदे
‘खेळाद्वारे सुदृढता’ हाच कामाचा केंद्रबिंदू
By admin | Published: August 13, 2015 12:14 AM