एकनाथ पाटील / कोल्हापूर डोंगर-दऱ्या, खुरटी झुडपे आणि स्मशान शांतता असलेल्या शहराशेजारील कात्यायनी, पाचगाव व गिरगाव परिसरातील माळ खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुन्हेगारांना सुरक्षित ठिकाण बनली आहेत. एक महिन्यापूर्वी कात्यायनी परिसरात एका युवतीचा खून करण्यात आला होता. त्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाहीत. तोपर्यंत लहू ढेकणे याचा शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून मृतदेह पाचगाव-गिरगाव येथील डोंगरात टाकण्यात आला. या घटनांमुळे या परिसरात, शिवारात शेतीच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. करवीर व गोकुळ शिरगाव या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीच्या वादामुळे या परिसरात पोलिसांची गस्त नाही. याचाच फायदा घेत गुन्हेगारांनी या निर्जन परिसराला लक्ष केले आहे. कात्यायनी, पाचगाव व गिरगाव गावातील या माळरानाच्या सीमा एकमेकांस लागून आहेत. डोंगराळ भाग असलेल्या या परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर असल्याने कोणी एकटे-दुकटे जाण्याचे धाडस करीत नाही. दिवसा या मार्गावरून तुरळक रहदारी असते. रात्री सातनंतर या मार्गावर स्मशान शांतता असते. निर्जन, निसर्गसौंदर्याचा व धार्मिक परिसर म्हणून कात्यायनी परिसराची ओळख वाढू लागल्याने या परिसरात प्रेमीयुगुलांचा वावर वाढू लागला. निर्जनस्थळी आलेल्या प्रेमीयुगलांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे हा परिसर गुन्हेगारांचा अड्डाच बनला आहे. या निर्जन परिसराचा अनेकजण गैरमार्गांसाठी वापर करीत आहेत. दि. १९ एप्रिलला कात्यायनी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या चरीत २५ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह टाकण्यात आला होता. तिचा चेहरा ओळखू नये यासाठी चेहऱ्यावर सत्तर किलोंचा दगड ठेवण्यात आला होता. अशा घटनांनी या परिसरात गवत कापणे, गुरे चारण्यासाठी जाणारे गुराखी व शेतकरी या घटनांमुळे चक्रावून गेले आहेत. कणेरीवाडी येथील पाझर तलावात दि. ६ एप्रिल रोजी चाळीस वर्षांच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह खून करून पोत्यात बांधून टाकलेला गोकुळ शिरगाव पोलिसांना मिळून आला होता. या खुनाचे कोणतेही धागेदोरे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. हादेखील परिसर निर्जन आहे.
शहराशेजारचे निर्जन माळ गुन्हेगारी कारवाईची केंद्रे
By admin | Published: May 18, 2015 1:20 AM