शिरोली -कोल्हापूर-
शिरोली पोलीस ठाण्यातून वाटमारी करणार्या गंभीर गुन्ह्यातील पळून गेलेला आरोपी अविनाश कोकाटे उर्फ मच्छले (वय.२०,रा.कंजारभाट, मोतीनगर राजारामपुरी कोल्हापूर) हा चोकाक (ता.हातकणंगले) येथे बुधवारी रात्री बाराच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिरोली पोलीस ठाण्याच्या पथकाला सापडला.
अविनाश कोकाटे उर्फ मच्छले हा शिरोली पोलीस ठाण्यातून १६ नोव्हेंबर रोजी लघु शंकेसाठी गेला असता पोलीस काॅन्स्टेबलच्या हाताला हिसडा मारून पळून गेला होता .ही घटना घडून सात दिवस झाले होते. गेल्या सात दिवसापासून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, शिरोली, गोकुळशिरगांव, राजारामपुरी, गांधीनगर , करवीर पोलीस ठाण्याचे सहा पथक, आरोपी कोकाटे याला दिवस रात्र कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शोधत होते. पण हाती लागत नव्हता.
बुधवारी शिरोली पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कोकाटे चोकाक येथे असल्याची माहिती मिळाली आणि तेथून त्याला रात्री साडे बारा वाजता ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस कर्मचारी वसंत पिंगळे, मच्छिद्र पटेकर, अविनाश पोवार, संतोष माने, कृष्णात पिंगळे, सोमा महात, सोमा कोळी, सतीश जंगम ,सुरेश कांबळे, महादेव पाटील यांनी केली.