कोल्हापूर : अहिंसेच्या मार्गाने चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्र सरकारने अंत पाहू नये अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा चंद्रकांत यादव यांनी बुधवारी दिला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्ली येथे चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातील समन्वय समितीने १५ ते २२ डिसेंबरपर्यंत निरनिराळी आंदोलने करून व्यापक जनजागृती करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार बुधवारी शिवाजी पेठेत सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत ते बोलत होते.
यादव म्हणाले की, देशाचे पंतप्रधान शेतकऱ्यांचे व शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे ऐकण्याऐवजी ‘मन की बात’ सांगताहेत आणि भांडवलदार अदानी व अंबानींचे ऐकताहेत. हुकूमशाही पद्धतीने व दडपशाही पद्धतीने वागत असले तरीदेखील जनआंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे म्हणणे आणि काळे कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे म्हणाले, शेतकऱ्यांनी त्याचे एक ध्येय डोळ्यांसमोर ठेवून आंदोलन अव्याहतपणे चालू ठेवलेले आहे. याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. काल मावळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आज जिजाऊ ब्रिगेडचा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. सरकारकडे कोणतेच मुद्दे राहिले नसल्यामुळे ते या आंदोलनाच्या बाबतीत खलिस्तानवादी, चीन, पाकिस्तानचे पाठिंबा असलेले आंदोलन अशा प्रकारची खोटी विधाने करून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे जनतेचे प्रबोधन करण्यासाठी आम्ही ही व्यापक जनजागृती मोहीम या ठिकाणी घेतलेली आहे.
या वेळेस अजित चव्हाण, रवी जाधव, अतुल दिघे, रवींद्र मोरे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सुधा सरनाईक यांची देखील भाषणे झाली. यावेळेस अनिल चव्हाण, बी. एल. बर्गे, बाबूराव कदम, मधुकर पाटील, अशोक पवार, रमेश मोरे, सुनीता पाटील, चंद्रकांत पाटील, शंकर काटाळे, रमेश मोरे, सुभाष सावंत, बाबूराव घाडगे, सदा सामंत, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट अशोकराव साळोखे होते.