लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घटनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाचा एसटी आरक्षणमध्ये समावेश केला आहे. मात्र, दुर्दैवाने इंग्रजी व हिंदी अनुवादामध्ये चुकीचे शब्दलेखन झाल्याने ''धनगर'' या शब्दाऐवजी ''धनगड'' हा शब्द आल्याने या आरक्षणापासून या समाजाला वंचित राहावं लागलं आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ''धनगड'' हा शब्द दुरुस्त करून ''धनगर'' हा शब्द वापरावा. यासाठी सभागृहात एकमुखाने ठराव करून निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेच्या सभागृहामध्ये केली. ते म्हणाले, घटनेने धनगर समाजाचा समावेश एसटी आरक्षणामध्ये केला आहे. मात्र, दुर्दैवाने इंग्रजी व हिंदी अनुवादमध्ये चुकीचे लेखन झाल्याने धनगर शब्दामध्ये ''र'' ऐवजी ''ड'' शब्द आल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. यामुळे धनगर ही जात फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. मेंढपाळ करणारी ही जात असून जी सर्वसामान्य, गोरगरीब माणसं वाड्या-वस्त्यांमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात. आदिवासी जीवन जगतात. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मात्र, याच लोकांना आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र शासनाने ''धनगड'' हा शब्द दुरुस्त करून ''धनगर'' हा शब्द वापरावा, कारण याचा फायदा महाराष्ट्रातील १ कोटी २० लाख लोकांना होईल. चुकीचे लेखन दुरुस्त केल्यास त्यांना मुख्य प्रवाहात येता येईल. खऱ्या अर्थाने समाजावर होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे. यासाठी अनेकवेळा आंदोलने झाली. मात्र, यावेळी त्यांना फक्त आश्वासने दिली आहेत. आता या लोकांना न्याय मिळण्याची वेळ आलेली असून या सभागृहात एकमुखाने ठराव मंजूर करावा व निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी सभागृहामध्ये केली.