कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या रूग्ण वाढीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य समिती आल्यामुळे अर्धे शटर उघडून सुरू असलेला व्यापारी गुरूवारी बंद करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. आज, शुक्रवारी पुन्हा दुकाने सुरू करण्यावर व्यापारी ठाम आहेत.कोरोना आजार नियंत्रणात आलेला नाही, याची कारणे विविध पातळीवर शोधून उपाय योजना केले जात आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय आरोग्य समितीचा दौरा होता. दौऱ्यामुळे शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, बिंदू चौक, राजारामपुरी, महाव्दार रोड, शिवाजी रोड, सुभाष रोड आदी परिसरातील दुकानांचे अर्धे शटरही बंद करण्यात आले.सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. पण सरकारने याकडे दूर्लक्ष केले आहे. यामुळे नाईलाजास्तव दुकानदार अर्धे शटर उघडून व्यापार सुरू केला आहे. पण दिवसभर केंद्रीय आरोग्य समिती शहरात असल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना पूर्णपणे शटर बंद करण्यास भाग पाडले. शटर उघडू नये, यासाठी दिवसभर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. शहरातील दसरा चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, कसबा बावडा आदी प्रमुख रस्त्यावर पोलीस, महापालिकेचे कर्मचारी वाहनधारकांना अडवून मास्क परिधान केल्याची खात्री करत होते.
याशिवाय वाहन चालवण्याच्या परवान्याची विचारणा करीत होते. परवाना नसलेल्यांवर आणि मास्क परिधान न केलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. अर्धे शटरही बंद करण्यास भाग पाडल्याने सर्वच व्यापाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी आता दूकाने पूर्णपणे बंद करायचे नाही, अशी भूमिका व्यापाऱ्यांची आहे.