मिरज : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी काल, मंगळवारी --पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी केली. मिरज स्थानकाला भेटीदरम्यान त्यांनी पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.लाहोटी यांनी पुणे-मिरज-कोल्हापूर स्थानकादरम्यान निरीक्षण बोगीतून दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा होत्या. विशेष रेल्वेने कोल्हापूर , स्थानकात पाहणी करून लाहोटी मंगळवारी सकाळी मिरजेत आले. मिरज स्थानकात प्रवासी सुविधा व सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली.मिरज व कोल्हापूर रेल्वेस्थानकात प्रवासी संघटनांनी लाहोटी यांची भेट घेऊन कोरोना साथीमुळे बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी केली. यावेळी लाहोटी यांनी राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर पॅसेंजर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.मिरज स्थानकात रेल्वे सल्लागार समिती सदस्य व रेल्वे प्रवासी संघटनांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. मिरजेतून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात, मिरज-सोलापूर सुपरफास्ट गाडीचा कोल्हापूर गुलबर्गापर्यंत विस्तार करावा, बंद करण्यात आलेली कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस या हैदराबादपर्यंत नव्याने सुरू करावी आदी मागण्या त्यांच्याकडे करण्यात आल्या.यावेळी रेल्वे प्रवासी सेनेचे किशोर भोरावत, राजू पाटील व रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजित हारगे, बाबासाहेब आळतेकर, राजाभाऊ देसाई उपस्थित होते.
पुणे- कोल्हापूर दुहेरीकरण-विद्युतीकरणाची पाहणी, मध्ये रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी घेतली कामाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 4:06 PM