कोल्हापूर : केंद्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आलेल्या केंद्रीय समितीने गुरुवारी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन तेथील लसीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती घेतली. प्रत्येक दिवशी पन्नास हजार नागरिकांना लस देण्याची महापालिकेची व्यवस्था पाहून या पथकाने समाधान व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत नसल्याची दखल केंद्र शासनाच्या पातळीवर घेण्यात आली असून गुरुवारी हे केंद्रीय पथक कोल्हापुरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपल्यानंतर पथकातील सदस्यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रास भेट दिली. तेथील लसीकरणाच्या कार्यक्रमाची त्यांनी माहिती घेतली.
आयडीएसपी इंचार्ज डॉ. प्रदीप आवटे, आरोग्य उपसंचालक डॉ. प्राणिल कांबळे, अखिल भारतीय वैद्यक संस्थेचे सहायक प्राध्यापक डॉ. सत्यजित साहू यांचा पथकात समावेश होता. यावेळी जागितक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. हेमंत खरणारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, उपायुक्त निखिल मोरे, उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ. रुक्सार मोमीन, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई,
पथकाने सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्र भेट देऊन लसीकरण याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी लसीकरणाची कामकाज कशा पद्धतीने चालते, याची पाहणी केली. लसीकरणास गर्दी होते का? रांगेतील नागरिकांच्या रॅपिड अँटिजन चाचण्या करता का? लक्षणे असलेल्याची चाचणी करता की लक्षणे नसलेल्यांच्याही चाचण्या करता? लसीकरणावेळच्या गर्दीवर नियंत्रण कसे ठेवता, असे विविध प्रश्न पथकातील सदस्यांनी विचारले.
उपायुक्त मोरे व डॉ. रुक्साना मोमीन यांनी पथकाला माहिती दिली. महापालिकेने रोज पन्नास हजार नागरिकांना लस देण्याची व्यवस्था केली आहे; परंतु लस तेवढ्या प्रमाणात मिळत नाही. ज्या दिवशी लस येते त्यादिवशी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून ज्यांना लस दिली जाणार आहे, त्यांना केंद्रातून फोन केले जातात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखण्यास मदत झाली.
-जादा लस पुरवठ्यासाठी शिफारस करणार-
लसीकरण मोहीम गतीने व्हायची असेल तर आम्ही केलेल्या नियोजनाप्रमाणे लस मिळायला पाहिजे याकडे उपायुक्त निखिल मोरे यांनी पथकातील सदस्यांचे लक्ष वेधले. तेव्हा जास्तीत जास्त लसमात्र पुरवठा होण्याच्या अनुषंगाने आम्ही शिफारस करू, असे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
(फोटो देत आहे.)