कोल्हापूर : घाम गाळून पिकविलेल्या हक्काच्या शेतजमिनी तसेच उत्पादित शेतीमाल अंबानी, अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालून शेतकऱ्यांना गुलाम बनिवण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी येथे बोलताना केला. केंद्र सरकारच्या या कुटिल प्रयत्नाविरोधात शेतकरी, कामगार यांनी पेटून उठण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.प्रदेश कॉंग्रेस समितीच्यावतीने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीला चव्हाण मार्गदर्शन करत होते. राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते या रॅलीत ऑनलाईन सहभागी झाले. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते संगमनेर, औरंगाबाद, नंदूरबार, नागपूर, कोल्हापूर, पालघर, अमरावती, ग्वाल्हेर येथून सहभागी झाले.कॉंग्रेस सरकारच्या काळात देशभरात शेतीमालाला किमान हमीभाव, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्नसुरक्षा अशी मोठी यंत्रणा उभी करण्यात आली, परंतु मोदी सरकारने ती उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांचे वाटोळे केले. असा आरोपही चव्हाण यांनी केला. मोदींनी शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले, पण किती उत्पन्न वाढविले सांगायला तयार नाहीत.
उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ म्हणून सांगितले, पण सत्तेत येताच असा भाव देऊ शकत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. असे ते म्हणाले. शेतकरी, कामगार विरोधी कायदे मागे घेण्यासाठी व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विकासाऐवजी विकण्याचे कामसत्तेवर येताना विकास करण्याचे आश्वासन दिले, पण सत्तेवर येताच विकासमधील ह्यसह्ण काढून टाकला आणि सहकार, शेती, बँका विकण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. कॉंग्रेसने देशातील पन्नास कोटी शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे काम केले, पण मोदी यांनी काळे कायदे करून एका रात्रीत रस्त्यावर आणले, असे पाटील म्हणाले.राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. शेती आणि शेतकऱ्यास वाचविण्याचे कॉंग्रेसने केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, समन्वय देवीदास भन्साळी उपस्थित होते.