पन्हाळा : पन्हाळगडावर गेले अनेक वर्ष नगरपालिकेच्या दारात असणाऱ्या तोफांना तोफगाड्यांच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळाली. शिवराष्ट्र परिवार मार्फत पन्हाळगडावर दिमाखदार तोफगाडे लोकार्पण सोहळा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव घोषणाने पन्हाळगड दुमदुमून गेला. शिवभक्तिचा प्रचंड उत्साह, सजवलेले तोफगाडे, भगवे झेंडे अशा उत्साही वातावरणात तोफांना महाराष्ट्र दिनी तोफगाड्यांच्या माध्यमातून मोठा सन्मान मिळाला.
यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रमेश शेंडगे, नगरपालिका मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, निवासी नायब तहसीलदार विनय कौलवकर, माजी नगराध्यक्ष रूपाली धडेल, रवींद्र धडेल, शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, जिल्हाध्यक्ष मोहन खोत, मोहीम प्रमुख गणेश कदम, श्रेयश भंडारी, अतुल कापटे, यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला. यावेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे म्हणाले, पन्हाळगडाला खूप मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. शिवराष्ट्र परिवाराने तोफांचे केलेले संवर्धन खरोखरच स्तुत्य आहे. पन्हाळगड संवर्धनासाठी जे काही करावे लागेल ते शासन पातळीवर सहकार्य करू.
मुख्याधिकारी चेतनकुमार माळी म्हणाले, तोफांसह तोफगाड्यांच संवर्धन होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे कायमस्वरूपी छत उभारले जाईल. शिवप्रेमींना हा पाच तोफांचा ऐतिहासिक ठेवा कायमस्वरूपी पहावयास मिळेल. शिवराष्ट्राचा गड संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ब्रीद वाक्य माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल यांनी काढले. यावेळी तोफ कारागीर राजाराम सुतार आणि बाळकृष्ण सुतार यांच्यासह हानीफ नगारजी यांचा सत्कार झाला. पन्हाळा नगरपालिकेच्या आवारात गेले अनेक वर्ष तोफा ऊन, वारा, पावसात होत्या. या तोफांना सन्मान मिळाल्याने पन्हाळा वासियांसह शिवभक्तामध्ये मोठा आनंद झाला. यावेळी दिंडनेरली संयुक्त शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य अमर पाटील, सुनील जाधव, राहुल पवार, धैर्यशील कदम, अभिजीत पवार, शुभम पांढगळे आदी उपस्थित होते.