* साठ लाख रुपये खर्चाची फिल्टर प्रेस यंत्रणा सुरूइचलकरंजी : येथील कापडावर प्रक्रिया करणार्या कारखान्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्या सीईटीपीमध्ये साठ लाख रुपये खर्चाच्या फिल्टर प्रेसची यंत्रणा नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. नवीन यंत्रणेमुळे सीईटीपीतून बाहेर पडणार्या स्लज दुर्गंधी विरहीत होणार असून, तो वड्यांच्या स्वरुपात बाहेर पडणार आहे. शहर व परिसरात तयार होणार्या प्रोसेसर्स कारखान्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (सीईटीपी) बांधणी इचलकरंजी पॉवरलूम क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेतून सुमारे २४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे. शहरातील पॉवर व हॅण्ड प्रोसेसर्समधून निर्माण होणारे सांडपाणी सीईटीपीमध्ये घेऊन ते प्रदूषण विरहीत केले जाते. अशा प्रकारच्या सुमारे दहा दशलक्ष लिटर पाण्यावर दररोज प्रक्रिया केली जाते. हा प्रकल्प शहरातील नगरपालिका व प्रोसेसर्सधारक संयुक्तरित्या चालवतात. त्याचे व्यवस्थापन वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसिंग असोसिएशनकडे आहे.प्रकल्पातून बाहेर पडणार्या स्लजमधून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होते. म्हणून आसपासच्या वसाहतीत राहणार्या वसाहतीतील लोकांनी वारंवार आंदोलने केली. त्यापैकी काही आंदोलनांचे नेतृत्व नगरसेवक अब्राहम आवळे यांनी केले होते. यावर उपाय म्हणून सीईटीपीकडे साठ लाख रुपये खर्चाची फिल्टर प्रेस यंत्रणा सुरू करण्यात आली. सदरची यंत्रणा सुरू करणे आणि प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीराज मोहता, संचालक लक्ष्मीकांत मर्दा, चंद्रकांत मेटे, संदीप मोघे, संदीप सागावकर, आदींनी परिश्रम घेतले.फिल्टर प्रेस यंत्रणा सुरू होताना शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, माजी नगराध्यक्षा सुमन पोवार, नगरसेवक शशांक बावचकर, अजित जाधव, असोसिएशनचे संचालक श्रीनिवास बोहरा, कामगार नेते शामराव कुलकर्णी, अहमद मुजावर, आदींसह प्रोसेसर्सधारक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
इचलकरंजीतील सीईटीपीकडे दुर्गंधी प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित
By admin | Published: May 09, 2014 6:10 PM