म्हालसवडे : चाफोडी ( ता. करवीर ) येथील ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक ६५ वर्षांत पहिल्यांदाच बिनविरोध झाली. पक्षीय राजकारणाला बगल देत हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता सर्वपक्षीय एकजूट करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखालील हनुमान ग्रामविकास आघाडीने तरुणांना उमेदवारी दिली. पाच अपक्ष उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही निवडणूक बिनविरोध झाली आहे .
चाफोडी, बेरकळवाडी व दोनवडी या तीन गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाची सलग ५५ वर्षे व त्यानंतर काँग्रेस पक्षाकडे दहा वर्षे सत्ता होती.
नाना पाटील, तानाजी काशीद, बळवंत पाटील, दादू सुर्वे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व पक्षांतील तरुणांना संधी देत बिनविरोधसाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाला. साताप्पा सुर्वे, सुरेखा काशीद, अनिता पाटील, सुनीता खोंद्रे, संजय सुतार, दीपक कांबळे, पंढरीनाथ भोपळे, संध्या काशीद, ललिता सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. याकरिता पोलीस पाटील भगवान पाटील, कुंडलिक बेरकळ, संजय खोंद्रे, पंडित कोपार्डे, शंकर पाटील, गुंडू सुर्वे यांनी विशेष परिश्रम घेतले.