कोल्हापूर : सैन्यात नोकरी लावतो म्हणून चार तरुणांची एकूण २१ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेला संशयित तानाजी कृष्णात पोवार (मुक्काम पोस्ट कासार पुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला दि. २ जानेवारी २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दुसरा संशयित आरोपी रोहित मारुती मुळीक (मु. पो. भादवण, ता. आजरा) याचा पोलीस शोध घेत आहेत. तो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या प्रकरणातील साखळी उघडकीस येण्याची शक्यता राजारामपुरी पोलिसांनी वर्तवली आहे.
सैन्यदलात नोकरी लावतो, म्हणून शिवाजी भगवान फड (रा. मूळ लातूर, सध्या पुणे), नवनाथ मुंडे (रा. बीड), संग्राम राठोड (जि. नांदेड), रहिम पीरवाले (उदगीर, जि. लातूर) या चौघांकडून २१ लाख ५० हजार रुपये घेऊन तानाजी पोवार व त्याचा साथीदार रोहित मुळीक यांनी त्यांना बनावट सही-शिक्क्यांचे नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर त्यांना आर्मी कॅम्प (झांशी) येथे पाठवले. त्यांच्याकडून त्यांना तेथील कॅंन्टोन्मेंट बोर्डचे फोटो, शिक्का, सही व नाव-नंबर असलेले ओळखपत्र देऊन आठवडाभर कामे करून घेतली. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली.
शिवाजी विद्यापीठाशी पोवारचा संबंध नाही
दरम्यान, याप्रकरणी अटक केलेला संशयित तानाजी कृष्णात पोवार याचा शिवाजी विद्यापीठाशी कोणताही संबंध नसल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर यांनी पत्रकाद्वारे दिली. अशा नावाच्या व्यक्तीस शिवाजी विद्यापीठातील सुरक्षा विभाग अथवा शिवाजी विद्यापीठात नियुक्त केलेल्या सुरक्षा पुरवठादाराकडून सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आलेली नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.