कोल्हापूर : शहरातील राजेंद्रनगर व रमणमळा परिसरात भरधाव दुचाकीचालकांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन धूम स्टाईलने पळ काढल्याच्या स्नॅचिंगच्या घटना घडल्या. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. यापैकी एका घटनेत इराणी टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रमणमळा ते पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या मार्गावरुन बेनेदिक्कत मार्टीस (वय ७०, रा. छत्रपती पार्क, पॅलेस व्हॅली अपार्टमेंट, रमणमळा) या वृध्दा शनिवारी सकाळी साडेअकराच्यासुमारास घरातून पायी नातेवाईकांकडे जात होत्या. भरधाव वेगाने दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी हिसडा मारुन त्या वृध्देच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाच्या सोन्याच्या चेन लंपास केल्या. वृध्देने चेन हाताने पकडल्या, पण चोरट्यांनी हिसडा मारल्याने एक पूर्ण चेन व अर्धी माळ घेऊन चोरट्यांनी पलायन केले. चोरट्याने डोक्याला हेल्मेट घातले होते. पाठीमागे बसलेल्या चोरट्याने तोंडाला मास्क व अंगात पांढरा शर्ट, तपकिरी पॅट परिधान केली होती. पोलिसांना परिसरातील चोरट्याचे सीसी टीव्ही फुटेज हाती लागले. चोरीची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली.
दुसरी घटना राजेंद्रनगरातील म्हाडा कॉलनीत दुपारी साडेबाराला घडली. स्मिता सुरेश पवार (वय ४७, रा. म्हाडा कॉलनी, महालक्ष्मी पार्क) या भाच्यासोबत घरासमोर मोपेड घेऊन उभारल्या. त्यावेळी एस. एस. सी. बोर्डकडून भरधाव मोेपेडस्वार (नं. एमएच.०९-५२३७) चोरटा आला. त्याने पवार यांच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण हिसडा मारुन धूम स्टाईलने पळ काढला. चोरट्याने डोक्याला काळे हेल्मेट तसेच अंगावर शेवाळी रंगाचे जॅकेट, हातमोजे घातले असल्याचे वर्णन फिर्यादी पवार यांनी पोलिसांना सांगितले.
नाकाबंदीत वाहने तपासणी
एकाचवेळी दोन चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्याने शहरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली; पण चोरटे हाती लागले नाहीत.
फोटो नं. २६१२२०२०-कोल-चोरी०१
ओळ : रमण मळा येथे झालेल्या चेनस्नॅचिंग घटनेचे सीसी टीव्ही फुटेज
पोलिसांच्या हाती लागले.