कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा आज, बुधवारी (दि.५) होत आहे. यानिमित्त गेल्या चार दिवसांपासून उंचच उंच सासनकाठ्या घेऊन लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. खोबरं, गुलालाची उधळण आणि चांगभलंच्या गजराने आत्ताच जोतिबा डोंगर न्हाऊन निघाला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सासनकाठीची पूजा होईल. सायंकाळी पालखी सोहळा होईल.कोल्हापूरचा रक्षक देवता वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र जोतिबा म्हणजेे सर्वसामान्य लाखो भाविकांचे आराध्य दैवत. महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रसह देवाची सर्वदूर ख्याती. अनेकांचे हे कुलदैवत. देवाची दरवर्षी चैत्रात सर्वात मोठी यात्रा भरते. तीन दिवसांच्या यात्रेतील मुख्य दिवस आज, बुधवारी आहे. पहाटे ३ वाजता घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी होतील.पहाटे ५ वाजता पन्हाळा प्रांत अमित माळी यांच्यासह देवस्थान समितीच्याक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाअभिषेक होईल. त्यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा होईल. दुपारी १ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन होईल. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांच्यासह मानकरी उपस्थित असतील.यानंतर सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू होईल. सायंकाळी साडेपाच वाजता तोफेच्या सलामीने देवाची पालखी यमाई मंदिराच्या दिशेने निघेल. सूर्यास्तानंतर यमाई (रेणुका) देवी व जमदग्नीचा विवाह सोहळा होईल. रात्री ८ वाजता देवाची पालखी पुन्हा जोतिबा मंदिरासाठी प्रस्थान करेल. रात्री १० वाजता पालखी सोहळा पूर्ण होईल.गेल्या चार दिवसांपासून डोंगरावर भाविक येत असून यात्रेआधीच डोंगर खोबरं व गुलालाने रंगला आहे. मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या आहेत. देवस्थान समिती, जिल्हा परिषद पोलिस प्रशासन व वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीच्यावतीने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेवर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच असणार आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्यावतीने अन्नछत्र, आरोग्य सेवेची यंत्रणा सज्ज आहे. एसटी महामंडळाच्यावतीने २४ तास बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
दख्खनचा राजा जोतिबाची आज चैत्र यात्रा, सासनकाठ्यांसह लाखो भाविक डोंगरावर दाखल
By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 04, 2023 7:03 PM