कोल्हापूर : प्रोत्साहन अनुदानाची रक्कम तातडीने द्या, शेतीपंपाला दिवसा वीजपुरवठा करा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २२ फेब्रुवारीला राज्यभरात चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ऊस वाहतूकदारांच्या फसवणुकीविरोधात लढा उभारण्यासाठी स्वाभिमानी ऊसतोडणी-वाहतूकदार संघटनेची स्थापनाही करत असल्याचे त्यांनी सांगितले.शेट्टी म्हणाले, ऊसतोडणी वाहतूकदारांचा प्रश्न जटिल बनला असून, राज्यात २०२०-२१ व २०२१-२२ या हंगामात ऊस वाहतूकदारांचे ९९२ कोटी रुपये बुडाले आहेत. मजुरांना आणण्यासाठी गेले की, वाहतूकदारांवरच गुन्हे दाखल केले जातात. यासाठी मुकादम व्यवस्थाच संपुष्टात आणून गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी वाहतूकदार महामंडळाच्या माध्यमातून मजूर पुरविले जावेत, अशी अनेक वर्षे मागणी करीत आहे. महामंडळाने मजुरांना बिनव्याजी आगाऊ रक्कम द्यावी, मजुरांच्या पसंतीनुसार कारखान्यांना मजुराचा पुरवठा करावा, अशी आमची मागणी आहे.राष्ट्रीय महामार्ग सोडून आंदोलन‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते तालुक्याच्या ठिकाणी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. तेही बारावीची परीक्षा असल्याने विद्यार्थी परीक्षेला गेल्यानंतर दुपारी बारानंतर आंदोलन केले जाईल. राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन होणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
‘प्रोत्साहन’ अनुदानासाठी ‘स्वाभिमानी’चे २२ फेब्रुवारीला राज्यात चक्काजाम आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:05 PM