कोल्हापूर: कोरोना निर्बंधामुळे ५० लोकांच्यावर एकत्र जमल्यास कारवाई करू, अशा नोटीसा जिल्हा प्रशासनाने गुरुवारी धाडल्या असल्या तरी ठरल्याप्रमाणे आज शुक्रवारी शिरोली दर्ग्याजवळ महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यावर स्वाभिमानी ठाम आहे. दुपारी १२ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या आंदोलनात भाजप वगळून सर्व पक्षीय सहभागी होणार आहेत.
लॉकडाऊन काळातील वीज बिलांच्या माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निर्णायक आंदोलन हाती घेतले आहे. ही बिले माफच करावीत, यासाठी त्यांनी उर्जामंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही माफीचा निर्णय होत नसल्याने स्वाभिमानी अधिकच आक्रमक झाली आहे. आज राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नोटीसा लागू केल्याने स्वाभिमानी अधिकच संतप्त झाली आहे. कोरोनाचा कहर सुरू असताना पंतप्रधान बंगालमध्ये दोन लाख लोकांच्या एकत्र सभा घेतात; पण मग आम्ही तर त्यांच्याच धोरणामुळे कंगाल झालेलो असल्याने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलो तर कारवाईचा बडगा कसा काय उगारता, अशी विचारणा करत आजचे आंदोलन अधिक आक्रमक करण्याची तयारी केली आहे.
भाजपने या आंदोलनात सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी पंतप्रधानांकडे महाराष्ट्राला देणे असलेली जीएसटीची रक्कम देऊन त्यातील काही रक्कम वीज बिल माफीसाठी म्हणून द्यावी, असे सांगावे, असेही आवाहन स्वाभिमानीकडून करण्यात आले आहे. इरिगेशन फेडरेशनसह वीज बिल कृती समिती, डाव्या संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा आधीच निर्णय जाहीर केला आहे.