संदीप बावचे --- जयसिंगपूर -गेल्या दहा वर्षांपासून जयसिंगपुरातील कचऱ्याचा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. शहरातून दररोज १६ टन कचऱ्याचा उठाव होत आहे. २०१० मध्येच कचरा टाकण्यावरून चिपरी ग्रामस्थ व जयसिंगपूर पालिकेत संघर्ष निर्माण झाला होता. जयसिंगपूरचा कचरा आमच्या गावात का? अशी भूमिका चिपरीकरांनी घेतली होती. कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाबरोबरच घनकचरा प्रकल्पही कागदावरच राहिला आहे. कचऱ्याच्या प्रदूषणावरून चिपरी ग्रामस्थांनी पुन्हा विरोधाची भूमिका घेतली आहे. सुरुवातीला जयसिंगपूर शहरातील कचरा सांगली-कोल्हापूर महामार्गावरील धर्मनगरजवळ टाकला जात होता. कालांतराने तेथे वाढलेल्या वस्तीमुळे पालिकेने तेथे कचरा टाकणे बंद केले. त्यानंतर नांदणी नाक्याजवळील खाणीत कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यालाही स्थानिक नागरिकांचा विरोध झाला. शहरात बंद अवस्थेत असणाऱ्या विहिरीत कचरा टाकून त्या मुजविण्यात आल्या. त्यानंतर कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे मांडल्यानंतर चिपरी गावच्या हद्दीत दोन एकर जागा पालिकेला मिळाली होती. यावेळी नगरपालिकेने १३ व्या वित्त आयोगातून सुमारे एक कोटी रुपये खर्चाचा प्रदूषणविरहित प्रकल्प उभारण्याच्या हालचाली त्यावेळी केल्या होत्या. दरम्यान, टप्प्याटप्प्याने पालिकेने कचरा टाकण्यासाठी उपलब्ध झालेल्या जागेवर वॉल कंपाऊंड, कचऱ्यातील पाणी जमिनीत झिरपून त्याचे प्रदूषण होऊन लोकांना दूषित पाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी काँक्रिट बेड टाकण्यात आले होते. यावेळी चिपरी गावच्या हद्दीत कचरा टाकण्यावरून ग्रामस्थ व जयसिंगपूर पालिका यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून हा संघर्ष धुमसत आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून जयसिंगपूर नगरपालिकेकडून शहरातील घनकचरा, मृत जनावरे टाकण्यात येत आहेत. खाणीतील दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांना जाणवू लागल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये नगरपालिकेकडे तक्रार दाखल करून कचरा न टाकण्याची विनंती केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत खाणीत कचरा टाकण्याची मुदत घेतली होती. तसेच १ जानेवारीपासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकणार नसल्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १) चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरच्या कचऱ्याला विरोध करीत कचरा डेपोसमोर चरखुदाई करून रस्ता बंद केला आहे. यामुळे दोन दिवसांपासून कचरा भरून जाणारी वाहने थांबून आहेत. दरम्यान, कचरा टाकण्यासाठी पालिकेकडे सध्या पर्यायी जागाच उपलब्ध नसल्यामुळे पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींसमोर आव्हान उभे राहिले आहे. ‘लोकमत’कडून वृत्तजयसिंगपूरच्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर, ३१ डिसेंबरपर्यंत चिपरीत कचरा टाकण्याची मुदत, चिपरीकरांचा विरोध या मथळ्याखाली ९ डिसेंबर २०१६ रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करुन कचऱ्याचा प्रश्न मांडला होता. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कचरा डेपोसमोर चरखुदाई करुन रस्ता बंद करुन चिपरी ग्रामस्थांनी जयसिंगपूरचा कचरा आमच्या गावात का? अशी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कचऱ्यावरुन आज सभाचिपरीच्या हद्दीत जयसिंगपूरचा कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी मज्जाव केल्याने शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे जयसिंगपूर पालिकेची आज, मंगळवारी तातडीची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. कचरा प्रश्नासाठी नव्या सभागृहाने ही सभा आयोजित केली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
कचरा विल्हेवाटीचे पालिकेसमोर आव्हान
By admin | Published: January 03, 2017 12:32 AM