कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची साखळी तोडण्याचे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महापालिका प्रशासन जरी प्रयत्न करीत असले तरी नागरिकांमधील बेशिस्तपणा नडत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत होणारी गर्दी, सामाजिक अंतर राखण्याकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सरासरी २७० नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे.
कोल्हापूर शहराची लोकसंख्या सहा लाखांच्या आसपास आहे, तसेच बाहेरील गावातून रोज शहरात येणाऱ्यांची संख्या ही सव्वालाखाच्या घरात आहे. बारा ते पंधरा गावे ही शहरालगत असल्याने रोज तेथील नागरिक नोकरी, व्यवसाय करण्याच्या निमित्ताने शहरात येतात. त्यामुळे शहरात रस्त्यावर नागरिकांची गर्दी होताना पाहायला मिळते. सकाळी सात ते अकरा यावेळेत भाजी विक्रीसह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, फळगाड्यांना परवानगी देण्यात आली असल्याने मर्यादित वेळेत प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण राखण्यास महापालिका प्रशासनास अजूनही यश मिळालेले नाही.
या गर्दीत कोरोना वाहक फिरत असल्याने संसर्ग वाढत चालला आहे. गेल्या दहा दिवसांत रोज सरासरी २७२ ते २७९ नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. मागच्या मंगळवारी व बुधवारी तर ही रुग्णसंख्या अनुक्रमे ३४० व ३५८ इतकी होती. यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील रुग्णांचाही समावेश आहे. कोल्हापूर शहरात सध्या २७५३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यावरूनच बाधितांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे.