कोल्हापूर : राज्यात भाजपची, तर महानगरपालिकेत कॉँग्रेस आघाडीची सत्ता राहिल्यामुळे गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे अनेक प्रकल्प रखडले. शहर विकासापासून वंचित राहिले; मात्र आता नव्या सरकारसमोर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प पूर्ण करण्याचे एक आव्हान असणार आहे.
कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्याची योजना २०१४ मध्ये कॉँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केली. सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार अथवा पालकमंत्री यांचे सहकार्य अपेक्षित होते ते मिळाले नाही; त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.
पाच कोटी खर्चाचा सेफ सिटी प्रकल्प - दुसरा टप्पा, सात कोटींचे बहुमजली वाहनतळ, १४ कोटींचा केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुशोभीकरण - दुसरा टप्पा, ८० कोटींचा अंबाबाई मंदिर विकास आराखडा, १७० कोटींचा अमृत योजना प्रकल्प, नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधिस्थळ, दुसरा टप्पा, १० कोटींचा नगरोत्थान योजनेतील रस्ते यासह अन्य काही महत्त्वाची विकास कामे रखडलेली आहेत. रखडलेल्या कामांना गती देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे.