कोल्हापूर : केंद्र शासनाकडून जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचे शिक्षण संस्थांसमोर आव्हान असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. यातील उणिवा आणि चांगल्या गोष्टी यांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी अभ्यास गट नेमून एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिी अधीक्षक कार्यालय ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालय या मार्गाला शुक्रवारी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पथ असे नामकरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, आत्तापर्यंत या देशातील शैक्षणिक धोरण सर्वधर्मसमभाव या भावनेवर आधारित होते. नवे शैक्षणिक धोरणही तसेच आहे का? हे तपासले पाहिजे. जीडीपीच्या साडेचार टक्के निधी आपण शिक्षणावर खर्च करतो. तो सहा टक्क्यांवर न्यायचा आहे. म्हणजे सुमारे अडीच लाख कोटी रुपये खर्च करावे लागतील. दोन कोटी विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार या धोरणात केला गेला आहे. भविष्यात सर्व शिक्षण संस्था या स्वायत्त असतील. विद्यापीठांचे अस्तित्वच संपेल.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीराम साळुंखे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. अशोक पाटील यांनी केले. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा प्राचार्या शुभांगी गावडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, सरिता मोरे, माजी नगरसेवक अर्जुन माने, स्वाती यवलुजे, अशोक जाधव, नंदकुमार मोरे, नीलेश देसाई, प्राचार्य डॉ. युवराज भोसले, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार आदी उपस्थित होते.
चौकट
डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान प्रेरणादायी
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षण प्रसाराचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांचे कार्य बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे. राज्यातील शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
फोटो : ०१०१२०२० काेल पालकमंत्री न्यूज
ओळी : कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉल ते एस.पी. ऑफिस चौक या मार्गाचे शुक्रवारी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे पथ असे नामकरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, सरिता मोरे, स्वाती यवलुजे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, नंदकुमार मोरे, अर्जुन माने उपस्थित होते.